स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (१ /३ / २० २६):
इंदापूरच्या पावन भूमीत तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा योगसाधनेचा महाकुंभ भरणार आहे. सन २०१४ मध्ये योगगुरु स्वामी रामदेवजी महाराज यांचे भव्य-दिव्य योग शिबीर इंदापुरात संपन्न झाले होते. त्या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्मृती आजही इंदापूरकरांच्या मनात ताज्या असतानाच, आता स्वामीजींचे पट्टशिष्य आणि पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी प.पू. स्वामी परमार्थदेव जी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय विनामूल्य ‘इंटिग्रेटेड योग शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे.
२१ वर्षांच्या अविरत सेवेचे फलित
पतंजली योग समिती, इंदापूर गेल्या २१ वर्षांपासून विनामोबदला योगसेवा देत आहे. या निष्ठेची दखल घेऊनच हरिद्वार योगपीठाने इंदापूरसाठी या विशेष शिबिराचे नियोजन केले आहे. योगरत्न श्री. दत्तात्रय ज्ञानदेव अनपट आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या परिश्रमातून हे शिबीर साकार होत आहे.
आरोग्य रक्षणार्थ ‘योग’ हीच काळाची गरज
कॅन्सर, मधुमेह, सांधेदुखी आणि वाढता मानसिक ताण यांसारख्या व्याधींवर योग हाच रामबाण उपाय आहे. १०, ११ आणि १२ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या शिबिरात नागरिकांना थेट स्वामी परमार्थदेवजींकडून योगविद्येचे धडे गिरवण्याची संधी मिळणार आहे.
शिबिराचे मुख्य आकर्षण व नियोजन:
- दिनांक: १०, ११ आणि १२ मार्च २०२६.
- वेळ: पहाटे ५:०० ते ७:३० (मुख्य शिबीर).
- ठिकाण: इंदापूर नगरपालिका नवीन इमारती शेजारील मैदान, १०० फुटी रोड.
- विद्यार्थी विशेष: १० आणि ११ मार्च रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन वर्ग.
- इतर सत्रे: १० मार्चला निरा नरसिंहपूर येथे ध्यान शिबीर (दुपारी ३ वा.) आणि ११ मार्चला तहसील कार्यकर्ता बैठक (दुपारी ३ ते ५).
जनतेला आवाहन:
या सुवर्णसंधीचा लाभ इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरासाठी येताना सोबत स्वतःचे आसन (सतरंजी) व चप्पल ठेवण्यासाठी कापडी पिशवी आणणे आवश्यक आहे.
