संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर
पुणे: ( दि.६)
वाढत्या जागतिक तापमानामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. अशा वेळी नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने ‘एक व्यक्ती, एक झाड’ ही संकल्पना राबवली, तरच आपण भविष्यातील गंभीर संकटांपासून मानवी सृष्टीला वाचवू शकू, असे प्रतिपादन वृक्ष संजीवनी परिवाराच्या मार्गदर्शिका सौ. सायराभाभी आत्तार यांनी केले.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, पुणे येथे राष्ट्रभक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. यामध्ये इंदापूर येथील वृक्ष संजीवनी परिवाराच्या सौ. सायराभाभी आत्तार यांना त्यांच्या वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणातील मोलाच्या कार्याबद्दल ‘राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सौ. भारतीताई तूपे व राजेंद्र पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना आत्तार पुढे म्हणाल्या की, “वृक्ष हे आपल्यासाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी आहेत. ते आपल्याला प्राणवायू आणि शुद्ध हवा तर देतातच, शिवाय वातावरण थंड ठेवून पावसाचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करतात. वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम अत्यंत भीषण असतील, त्यामुळे पर्यावरण रक्षणाची ही चळवळ घराघरात पोहोचली पाहिजे.”
या दिमाखदार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रभक्ती संघटनेचे राजेंद्र पवार, सौ. सुनीताताई किर्वे, डॉ. मंगेश पेंडामकर, मंगेश नागवडे पाटील, कार्यक्रमाचे संयोजक सुनील गोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्कारामुळे इंदापूर परिसरातून आणि पर्यावरण प्रेमींकडून सायराभाभी आत्तार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.