स्टार के बी न्यूज​

संपादक – काकासाहेब मांढरे

इंदापूर( दि. २७ /२ / २० २६ ): .

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय बावडा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी बावडा ग्रामस्थांच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत बावडा पोलीस दूरक्षेत्राच्या उपनिरीक्षकांना आज निवेदन देण्यात आले.

घातपाताचा संशय आणि ‘बावडा बंद’ची हाक

​निवेदनात नमूद केल्यानुसार, अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर ज्या काही बाबी समोर येत आहेत, त्यावरून हा केवळ अपघात नसून एक नियोजित घातपात असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

​आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत ‘बावडा गाव बंद’ ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:

  • ​विमान अपघात प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी व्हावी.
  • ​तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी.

​या निवेदनावर पवनराजे घोगरे-पाटील, अशोक मगर, शितल कांबळे, विक्रांत घोगरे, जिग्नेश कांबळे, किशोर घोगरे, भैया घोगरे, सुभाष किसन गायकवाड, अमीर सलाउद्दीन सय्यद, हनुमंत भोसले आणि निलेश घोगरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पोलीस अंमलदारांनी सदर निवेदनाचा स्वीकार केला असून पुढील कारवाईचे आश्वासन दिले आहे