स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर
मुंबई |( २५ फेब्रुवारी २०२६ ) :
उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. भिमा उपसा सिंचन विभागामार्फत धरणग्रस्तांना पाठवण्यात आलेल्या ‘अतिक्रमण हटाव’ नोटिसा तात्काळ रद्द कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पी.पी.पी. (PPP) तत्त्वावर देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी या निवेदनाची दखल घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
धरणग्रस्तांचा त्याग आणि सद्यस्थिती
उजनी धरणाच्या निर्मितीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड आणि कर्जत तालुक्यातील ८१ गावांनी आपल्या सुपीक जमिनींचा त्याग केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नाममात्र किमतीत जमिनी शासनाला दिल्या, परंतु त्यांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. अनेक गावे आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत. अशा परिस्थितीत, शासनाने १७ जून २०१९ आणि ८ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार धरण क्षेत्रातील अतिरिक्त जमिनी ४९ वर्षांच्या करारावर पी.पी.पी. तत्त्वावर देण्याचे प्रस्तावित केले आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे गाळपेर जमिनीत चारा पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असून, याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.
प्रशासकीय विसंगतीकडे वेधले लक्ष
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी जुन्या शासन निर्णयांची आठवण करून दिली. १९७३ आणि १९७४ च्या शासन निर्णयानुसार, संपादित केलेली परंतु प्रकल्पासाठी न लागणारी जमीन मूळ मालकाला परत करणे किंवा भाडेकरारावर देणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याचा नवीन निर्णय हा मूळ धोरणाशी विसंगत असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
”ज्या धरणग्रस्तांनी प्रकल्पासाठी आपले सर्वस्व दिले, त्यांच्यावर ‘अतिक्रमण हटाव’च्या नोटिसा बजावणे अन्यायकारक आहे. या नोटिसा रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्यापेक्षा मूळ मालकांना परत मिळाव्यात, हीच आमची प्रमुख मागणी आहे.”
— दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री) व हर्षवर्धन पाटील (माजी मंत्री)
या भेटीमुळे इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रश्नाला मोठे वजन प्राप्त झाले असून, आता शासन यावर काय ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
