
स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १६ / २ / २० २३) :
कालठण नं १ (ता इंदापूर) येथील उत्कर्ष विद्या मंदिर विद्यालयातील १९९०-९१मध्ये दहावीत शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी तब्बल ३२ वर्षानंतर स्नेहमेळाव्यानिमित्त पुन्हा वर्गामध्ये एकत्र आले. यावेळी माजी विद्यार्थी दिवसभर शिक्षकांबरोबर रमले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास १० सी. सी. टी व्ही कॅमेरे सुरक्षेसाठी मदत म्हणून बसविण्यात आले.
स्नेह मेळाव्याची सुरवात कार्यक्रमांचे अध्यक्ष तुकाराम जाधव व प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम के. खुसपे व लालासाहेब जगताप यांच्या हस्ते कै. दत्तात्रय जाधव (बापू) व सरस्वती यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.
आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर कालठण नं १ (ता इंदापूर) येथील उत्कर्ष विद्या मंदिर विद्यालयातील १९९० – ९१मध्ये दहावीतशिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी उत्कर्ष विद्या मंदिर या प्रशालेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम. के. खुसपे, डी. डी. घोगरे, डी. डी. मदने, विद्यालयाचे मुख्याध्यापक माने , एन. एम. शेख, डी. आर. रूपनवर, एस. आर. फडतरे, यु.ए.कोल्हे,डी.डी.दुनाखे,आर.डी बोराटे, ए. व्ही भोईटे, सौ. आर. बी वणवे सौ. पी.एस.खताळ,श्रीमती एस. पी जगताप डी. एम. सावंत, एच. यू. जगताप, एस. एस. जगताप आदी मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र विठ्ठल मुर्ती गुलाबपुष्प देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी रविकुमार जगताप, भारत शेंडगे, सुनिता जाधव बाळासाहेब सरडे, भगवान कोळेकर मोहन लोंढे, संतोष जाधव, सुहास शेळके, नंदा घोळवे यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी ३२ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता; तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही भावूक झाल्याचे दिसून आले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष जाधव बाळासाहेब पांडुळे, नवनाथ कोळेकर, काकासाहेब देवकर, मंगल पवार आदींनी परिश्रम घेतले. सदकार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत शेंडगे यांनी केले तर उपस्थिती सर्वांचे आभार मोहन लोंढे यांनी मानले.
==========
चौकट
….. अन् गुरूजनही भारावले..
स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांनी दुतर्फा उभे राहून शिक्षकांवरती केली पुष्पवृष्टी व सादर प्रणाम करून टाळ्यांच्या गजरात गुरूजनांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. गुरूजनही या अनोख्या स्वागताचे भारावून गेले. तर काहींना आनंदाश्रू अनावर झाले.
यावेळी ३२ वर्षानंतर विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षकांनी शाळेतील एकमेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या बॅचचे जवळपास ५२ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येकाने आपली ओळख सांगून सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणची माहिती सांगितली.
