​स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १३ ):

इंदापूर तालुक्यातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली असून, इंदापूर तहसील प्रशासनाने यासंदर्भात अधिकृत जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. मार्च २०२६ च्या सुरुवातीलाच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

काय आहेत नवीन दर?

​प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दरवाढीनंतरचे नवे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • घरगुती गॅस सिलिंडर (१४.२ किलो): ९२६ रुपये.
  • व्यावसायिक (Commercial) सिलिंडर: १९२१ रुपये.

सिलिंडर मर्यादेच्या नियमात बदल

​केवळ दरवाढच नाही, तर महिन्याला मिळणाऱ्या घरगुती सिलिंडरच्या मर्यादेतही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही मर्यादा २१ दिवसांची होती, ती आता वाढवून २५ दिवस करण्यात आली आहे.

पुरवठा सुरळीत, अफवांवर विश्वास ठेवू नका

​इंदापूर तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे की, इंदापूर तालुक्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने BPCL, HPCL आणि IOCL या तिन्ही कंपन्यांशी संपर्क साधला आहे. तालुक्यात पेट्रोल, डिझेल आणि एल.पी.जी. गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमित व सुरळीत राहील, असे कंपन्यांनी कळवले आहे. त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सी किंवा पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

काळा बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई

​गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध प्रशासन आक्रमक झाले आहे. जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार अशा व्यक्तींवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा इंदापूरच्या तहसीलदारांनी या सूचनेद्वारे दिला आहे.