स्टार केबी

संपादक – काकासाहेब मांढरे

इंदापूर ( दि.७ /३ / २ ० २६):

उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पाणी परवानग्यांच्या नूतनीकरणासाठी (Renewal) आता कागदपत्रांचा कोणताही जादा त्रास सहन करावा लागणार नाही. जुन्या पाणी परवानग्यांच्या आधारेच नवीन परवानग्या दिल्या जातील, असे महत्त्वपूर्ण आश्वासन उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. सुचिता डुंबरे यांनी कालठण नं. १ येथे दिले.

शेतकऱ्यांचा वेळ आणि त्रास वाचणार

​शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी कालठण नं. १ येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित ‘संवाद मेळावा’ अभियानांतर्गत त्या बोलत होत्या. अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्रांच्या जाचक अटींमुळे नूतनीकरण रखडल्याची तक्रार केली होती. यावर तोडगा काढताना सौ. डुंबरे म्हणाल्या की, “शेतकऱ्यांचा वेळ आणि कागदपत्रांचा त्रास वाचवण्यासाठी विभागाने लवचिक भूमिका घेतली आहे. ज्यांच्याकडे जुन्या पाणी परवानग्या आहेत, त्यांना त्याच आधारे नूतनीकरण करून दिले जाईल. यासाठी विभागातर्फे विशेष कॅम्प लावले जातील, ज्याची जबाबदारी माझी राहील.”

या शेतकऱ्यांनी मांडले प्रश्न

​या संवाद मेळाव्यात भास्कर पाडुळे, सतिश शिंदे, सुनिल जाधव, भगवान बापू कोळेकर, रमेश मदने, रविद्र पाडुळे, चिंचकर , दिलीप सपकळ , बाळासाहेब पांडुळे इत्यादी शेतकरी बांधवांनी , विहीरी साठी व ड्रीप साठी उपसा सिंचन, पाणीपट्टीतील सवलत तसेच दंड आणि थकबाकी हे जुलमी व जाचक असे विविध मुद्दे उपस्थित केले. या सर्व मुद्द्यांना अभियंता सौ. डुंबरे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

हक्काचे पाणी आणि पाणीपट्टी

​”धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे हक्काचे पाणी राखून ठेवले आहे, ते अधिकृतपणे वापरण्यासाठी पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. थकीत पाणीपट्टी दोन टप्प्यात भरण्याची सवलत आणि दंड माफीबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली. प्रशासनाच्या या भूमिकेस उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी एकमताने सहमती दर्शवली.

​यावेळी कालठण परिसरातील उजनी धरणातून पाईपलाईनद्वारे उपसा सिंचन करणारे शेतकरी, ग्रामस्थ आणि जलसंपदा विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.