स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे
इंदापूर ( दि. १६ ):
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे २०१२ साली झालेल्या ऐतिहासिक ऊस आंदोलनाप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह २१ जणांना इंदापूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
२०१२ मध्ये उसाला २७०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी राज्यात मोठे आंदोलन झाले होते. इंदापूर येथे तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘कर्मयोगी’ साखर कारखान्यावर राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ करण्यात आला होता, ज्यामुळे आंदोलनाला तीव्र वळण लागले होते.
न्यायालयाचा निकाल:
या आंदोलनानंतर आंदोलकांवर एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी:
१९ डिसेंबर २०२५ रोजी ३ गुन्ह्यांतून आरोपींची मुक्तता झाली होती.
उर्वरित ५ गुन्ह्यांपैकी आणखी ३ गुन्ह्यांचा निकाल सोमवारी लागला, ज्यात राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतीश काकडे, निलेश देवकर यांच्यासह २१ आंदोलकांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
अद्याप २ खटल्यांचा निकाल प्रलंबित आहे.
विनामूल्य कायदेशीर लढा:
या खटल्याचे न्यायालयीन कामकाज अॅड. एन. जी. शहा, अॅड. महेश धुके आणि अॅड. श्रीकांत करे यांनी पाहिले. विशेष म्हणजे या वकिलांनी आंदोलकांसाठी हे कामकाज विनामूल्य केले, अशी माहिती समोर आली आहे.
या आंदोलनात कुंडलिक कोकाटे या तरुण शेतकऱ्याला आपले बलिदान द्यावे लागले होते, ज्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. अखेर या आंदोलनामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३०० रुपये ज्यादा दर मिळाला होता.
