स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे
इंदापूर (प्रतिनिधी):
राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला असून, येत्या ३० जूनपूर्वी प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
एप्रिलमध्ये येणार समितीचा अहवाल
कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू आहेत. मंत्री भरणे यांनी सांगितले की, सध्या पात्र शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून एप्रिलपर्यंत ते पूर्ण होईल. या प्रक्रियेसाठी ‘परदेशी’ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल. आगामी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडतील, ज्यामध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक तरतुदींचे सूतोवाच केले जाऊ शकते.
अजितदादांच्या निधनानंतरची राजकीय परिस्थिती
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरही भरणे यांनी भाष्य केले. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी अनेक आमदारांची इच्छा असली, तरी सध्या पवार कुटुंब दुःखात असल्याने तेराव्या दिवसानंतर सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार एकत्र बसून चर्चा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘इंदापूरचा विकास आणि घड्याळावर विश्वास’
इंदापूरच्या राजकारणावर बोलताना भरणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “इंदापूरची जनता केवळ भाषणांना भुलणारी नाही, तर ती विकासकामांना महत्त्व देते. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (घड्याळ चिन्ह) सर्व उमेदवार विजयी होतील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजितदादांच्या पश्चात राज्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पक्ष एकजुटीने काम करेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
