स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १० / १ / २० २३) :
१९७० नंतरचा काळ असेल इंदापूर शहरांमध्ये एक सुसंस्कृत आनंदी प्रगतिशील असे वातावरण होते. अत्यंत कमी सुविधा असलेल्या गावांमध्ये शैक्षणिक दृष्ट्या परिपूर्णता मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून शहराने परिसरामध्ये काही शिक्षक हे सतत प्रयत्नशील होते. यामध्ये अनेक नावे सांगता येतील परंतु प्रामुख्याने प्राथमिक शिक्षणामध्ये आधुनिकता प्रभावीपणा व सुसंस्कृतपणा येण्यासाठी व्यवहारी गुरुजी हे विशेष प्रयत्नशील असायचे. त्यांचे जीवन हे विद्यार्थीमय होते. विद्यार्थी हि त्यांची संपत्ती होती. मला आठवते व्यवहारे गुरुजी जुन्या तहसीलदार कचेरीच्या खालच्या बाजूला असलेल्या देशपांडे वाड्यामध्ये राहत होते. पांढरा शर्ट, पांढरा पायजमा आणि पांढरी शुभ्र टोपी, अत्यंत स्वच्छ कपडे, हातामध्ये चावी चालण्याची एक वेगळीच लकब, बोलण्यामध्ये विश्वास, प्रभावीपणा आणि मार्गदर्शकपणा. आजही मला असे वाटते शिक्षक असावा तर व्यवहारे गुरुजींसारखा !कुठलाही स्वार्थ नाही, अपेक्षा नाही.फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा विकास यासाठी जीवन हे त्यांचे ध्येय होते. त्यांचे अनेक विद्यार्थी जिल्हाधिकारी झाले. प्रांत ,तहसीलदार ,पोलीस खात्यामध्ये महसूल खात्यामध्ये शिक्षण खात्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होऊन नाव लौकीक मिळवलेले. असे विद्यार्थी त्यांनी घडविले त्यांचा विद्यार्थी हा प्रामाणिक निर्व्यसनी सचोटीचा जीवनासाठी मार्ग शोधणारा. त्याकाळी विद्यार्थी हे आर्थिक दृष्ट्या अत्यंत गरीब असत. इंदापूर शहर आणि तालुका महाराष्ट्रातला दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जायचा. अत्यंत गरिबी अठरा विश्व दारिद्र्य. वर्षातून एकदा निघणारे ज्वारीचे पीक अशा प्रकारची जीवन पद्धती असणाऱ्या परिसरातले विद्यार्थी अशा याइंदापूरच्या परिसरातीलप्राथमिक शिक्षणाची मुख्य सूत्रे ही व्यवहारे गुरुजींकडे आली
इंदापूर शहरात शैक्षणिक वातावरण कसे वाढले पाहिजे, विद्यार्थी शांत -संयमी- प्रगतिशील कसा बनला पाहिजे, शैक्षणिक दृष्ट्या चोहो अंगाने विद्यार्थी तयार करायचा. त्यामध्ये मराठी, गणित ,विज्ञान त्याचबरोबर जीवन जगण्यासाठी आधारित मूलभूत शिक्षण, त्या शिक्षणातून सूतकताई अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना धडे देऊन माध्यमिक शाळांकडे गुरुजी समर्थपणे विद्यार्थ्याला पाठवीत असत. व्यवहारे गुरुजी हे आमच्या काळातले आमचे गुरुजी. म्हणून मला आजही आठवते 1985 साली आम्ही इंदापूर नगरपालिकेवर निवडून आलो आणि मी शिक्षण समितीचा सभापती झालो. त्याच काळामध्ये इंदापूर पंचायत समितीने *व्यवहारे गुरुजी आणि राऊत गुरुजी* यांची बदली केली. प्राथमिक शिक्षकांची बदली झाल्यानंतर इंदापूर शहर इतके अस्वस्थ झाले की गावातले सर्व प्रमुख नागरिक जमा झाले. पंचायत समितीमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की *व्यवहारे गुरुजी आणि राऊत गुरुजी हे आमचा श्वास आहेत.* त्यांची बदली कसल्याही परिस्थितीत होता कामा नये. तत्कालीन नगराध्यक्ष *डॉक्टर एम एम हेगडे* यांनी शिक्षण समितीला सूचना देऊन समितीची विशेष मिटींग बोलवायला लावली. या मिटिंगमध्ये *मी , अकबर भाई बागवान, एड. गिरीश शहा राजाभाऊ गोसावी* असे अनेक तत्कालीन नगरसेवक आणि समिती सदस्य जमा झाले. आणि एकमुखाने ठराव करून पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी आणि महाराष्ट्र सरकार यांना कळविण्यात आले. लोकांची तीव्रता लक्षात घेऊन पंचायत समितीने बदली रद्द केली. यावरून व्यवहारे गुरुजी हे शहरासाठी किती आवश्यक गोष्ट होती. शिक्षणाशी ते किती मोठ्या प्रमाणात जोडले गेले होते. हे दिसून येते. व्यवहारे गुरुजी हे संपूर्ण शहराचे प्रेरणास्थान होते. तसे गुरुजींचे मूळ गाव *सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकम.* परंतु गुरुजी 22 वर्ष वयामध्ये इंदापूर मध्ये आले आणि इंदापूर रमले. संपूर्ण आयुष्य आणि त्यांची पुढची पिढी ही इंदापूर मध्येच केली. त्यांचा मुलगा *दयानंद व्यवहारे* हा शेती खात्यामध्ये नोकरीला लागला. नंतर त्याने नोकरी सोडून बांधकाम व्यवसाय हा यशस्वीपणे केला. सेवानिवृत्त झाल्यानंतर गुरुजींनी सामाजिक कार्य हातामध्ये घेतले. परंतु प्रपंचामध्ये कधीही रस दाखवला नाही. असे सर्वांचे *आदरणीय श्रद्धेय व्यवहारे गुरुजींचे आज निधन झाले.* त्यांच्या जाण्याने इंदापूर शहरातील *शिक्षण क्षेत्रातील फार मोठी हानी झाली आहे.* ज्यांनी शहराचे प्राथमिक शैक्षणिक जीवन घडवले ते व्यवहारे गुरुजी आज आपल्यात नाहीत. हे आपल्या मनाला पटत नाही. तरीपण वस्तुस्थिती मान्य करावे लागते. गुरुजींच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गुरुजींना सद्गती मिळो त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. त्यांना संपूर्ण *इंदापूर शहर आणि तालुका वाशी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!* गुरुजींच्या जाण्याने व्यवहारे परिवार आणि गुरुजी चे सर्व आजी-माजी विद्यार्थी यांना या दुःखातून उभा राहण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना.
—————–///——————
*शोकाकूल*
*गुरुजींचा आवडता विद्यार्थी प्रा. कृष्णा ताटे*
💐💐💐🙏🙏🙏
