स्टार केबी न्यूज
काजासाहेब मांढरे इंदापूर (दि. २९ / ११ / २०२३ ):

प्रसिद्ध कायदेतज्ञ तथा इंदापूर शहरातील नावाजलेले व्यक्तिमत्व ॲड. इनायतअली जफरअली काझी यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) इंदापूर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या पदासाठी शहरातून अनेकजण स्पर्धेत होते. मात्र त्यांची निवड निश्चित मानली जात होती. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी पार पडलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात याची औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ॲड. काझी यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने, पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिह पाटील, महारुद्र पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. या फुटीनंतर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे अजित पवार गटात सामिल झाले होते. परिणामी इंदापूर तालुक्यात पक्षाच्या पुनर्बांधणीकरिता विविध पदांसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू होती. विधीतज्ञ असण्यासह ॲड. काझी यांना मागील १०-१२ वर्षांची सामाजिक कार्यांची पार्श्वभूमी आहे. सर्वसमावेशक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या ॲड. काझी यांच्या रूपात राष्ट्रवादीला इंदापूर शहरात उच्च शिक्षित चेहरा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीनंतर साहजिकच इंदापूर शहरात शरद पवार गटाची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

सदर निवडीनंतर ॲड. काझी यांनी आपल्याला राष्ट्रवादी पक्षाकडून इंदापूर शहर अध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, संसदरत्न खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच मा. सभापती प्रवीण (भैय्या) माने, महारुद्र पाटील, ॲड. तेजस पाटील, सागर (बाबा) मिसाळ, जावेदभाई इनामदार व पक्षातील इतर नेते मंडळी यांचे आभार मानले आहेत. तसेच आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांचेही ऋण व्यक्त केले आहे.