स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. २१ / ३ / २० २३) :
– इंदापूरमध्ये 2.5 कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगभवन बांधले जाणार
– – – – – – – – – –
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर जागतिक योग दिनानिमित्त एकाच वेळी ३५००+ व्यक्तींनी सामूहिक योगासने करून योग दिन साजरा केला. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगगुरू स्वामी रामदेव यांच्या प्रयत्नातून आपल्या भारताच्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या योग कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा प्राप्त झाला आहे. आज 192 पेक्षा अधिक देशामध्ये योग दिन साजरा होत असून भारताची उंची जगामध्ये नेण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झाले आहे. इंदापूर नगरपरिषद आणि जिल्हा विकास मंडळाच्या माध्यमातून सुमारे 2.5 कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जाचे योग भवन इंदापूर मध्ये बांधले जाणार आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच त्यांच्या पत्नी जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील तसेच विविध पदाधिकारी , नागरिक, विद्यार्थी, शिक्षक या योग साधनेमध्ये सहभागी होऊन त्यांनी योगाचे धडे घेतले. पतंजली योग समितीचे दतात्रय अनपट आणि सिमरन थोरात तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी योग प्रात्यक्षिकासह योगाचे प्रशिक्षण दिले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की आपण सर्वांनी रोज योग करण्याची शपथ घेऊन आपला आत्मविश्वास वाढवायचा आहे आपले आत्मबल वाढवायचे आहे निरोगी जीवन जगण्यासाठी तसेच आपल्या कार्याची क्षमता वाढवण्यासाठी नियमित योग केला पाहिजे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये योग भवनासाठी मंजूर झाले असून इंदापूर नगरपालिकेने 15 कोटी रुपये किमतीची एक एकर जमीन नाममात्र किमतीमध्ये या योगभावनासाठी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला देखील नऊ वर्ष पूर्ण होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बलाढ्य अमेरिका राष्ट्रात स्टेट गेस्ट ( प्रमुख पाहुणे ) म्हणून मिळालेला सन्मानाने 135 कोटी भारतीयांचा स्वाभिमान उंचावला आहे.
संस्थेचे सचिव मनोहर चौधरी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर , उपप्राचार्य दत्तात्रय गोळे , माजी नगरसेवक शेखर पाटील तसेच मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले.