स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १९ / ६ / २० २३) :
इंदापूर नगरपालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर – गफुर सय्यद

इंदापूर नगरपरिषदेने शहरातील 100 वर्ष जुने चिंचेचा वृक्ष बेकायदेशीरपणे पाडल्यामुळे शेकडो चित्राबलक पक्षी मृत्युमुखी पडले आहे. त्या पक्षांना तालुक्यातील पक्षी मित्र व निसर्गप्रेमी यांनी रविवारी सामूहिक श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यावर चित्राबलक पक्षी व इतर पक्षांच्या हत्या केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावी अशी मागणी इंदापूरकर नागरिकांनी केली.

श्रद्धांजली वाहण्यासाठी इंदापूर नागरी संघर्ष समिती , नेचर क्लब इंदापूर , युवा क्रांती प्रतिष्ठान , मराठा सेवा संघ ,शिवभक्त परिवार, राष्ट्रसेवा दल ,भटक्या विमुक्त जमाती संघटना शिवदास जनकल्याण ट्रस्ट अशा विविध सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जखमी पक्षावर उपचार सुरू आहेत ,तसेच काही पक्षांचा मृत्यु झाला आहे.

राष्ट्रीय सेवा दलाचे गफूर सय्यद म्हणाले, या झाडाची कत्तल करण्यासाठी वनविभागाची व संबंधित प्रशासनाशी परवानगी घेणे आवश्यक होते मात्र अशी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. बेकायदेशीरपणे हे झाड तोडल्याने अनेक पशुपक्षी यांचा निवारा कायमस्वरूपी संपवला. पशूंची अमानुषपणे हत्याच केली. या पक्षांची तस्करी केली गेली आहे असा संशय आमच्या मनामध्ये असून संबंधित अधिकाऱ्यांवर पक्षांच्या हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना निलंबित केले पाहिजे अशी मागणी आम्ही या वतीने करत आहोत. संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन आम्ही गुन्हे दाखल करू असे आश्वासन इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पक्षीमित्रांना दिले.