स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर : ( दि.13/5/23 ) :

फोटो:- इंदापूर येथे पत्रकार परिषद बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. यावेळी लालासाहेब पवार, कांतीलाल झगडे व मान्यवर
– – – – – – – – – – – – — –
कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची ऊस बिले येत्या 20 दिवसात म्हणजे दि.5 जून पूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. केंद्र व राज्य सरकारने कारखान्यास सहकार्य केल्याने आता दोन्ही कारखान्यांचा आर्थिक अडचणीचा काळ संपला आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व नीरा भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी इंदापूर येथे येथे शनिवारी (दि.13) दिली.
कर्मयोगी व निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळांची बैठक पार पडल्यानंतर हर्षवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दोन्ही कारखान्यांना गेली दोन-तीन वर्षापासून खेळत्या भांडवला अभावी आर्थिक अडचणीचा काळ निर्माण झाला होता. मात्र आता या दोन्ही कारखान्यांना केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने खेळते भांडवल उपलब्ध होणार असल्याने, या दोन्ही कारखान्यांचा आर्थिक अडचणीच काळ आता संपला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या कामी सहकार्य लाभल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
प्रत्येक साखर कारखान्यास चढउताराचा काळ हा असतो. आपल्या भागातील अनेक कारखाने यापूर्वी अडचणीत होते, मात्र सध्या त्या कारखान्यांनी गत वैभव प्राप्त केले आहे. आगामी काळात कर्मयोगी व निरा भीमा हे कारखाने गत वैभव प्राप्त करतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले
कारखान्याने अडचणीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी ॲडव्हान्स दिले आहेत. तसेच या दोन्हीं कारखान्यांनी ऊस तोडणी व वाहतुकीची सर्व बिले अदा केली आहेत. गेली 34 वर्षे कर्मयोगी व 22 वर्षे निरा भीमाने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. विश्वास हीच आमची शिदोरी आहे. त्यामुळे कर्मयोगीची मालमत्ता तब्बल रु. 600 कोटी व निरा भिमाची मालमत्ता रु. 400 कोटींची झाली आहे. आता दोन्ही कारखान्यांना खेळते भांडवल उपलब्ध होणार असल्याने, आगामी गळीत हंगाम हे उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीने पार पडतील, असे हर्षवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी सांगितले.
एखादी संस्था स्थापन करून ती यशस्वीपणे चालविण्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट व त्रास सहन करून, वेळ द्यावा लागतो, तसेच अनेक वेळा इतरांचा वाईटपणा घ्यावा लागतो, हे आंम्ही शेतकऱ्यांसाठी केले आहे व आगामी काळातही करीत राहू. विरोधकांनी मात्र तालुक्यात सहकार क्षेत्रात एकही संस्था उभी करून चालविलेली नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
इंदापूर तालुक्यामध्ये साखर कारखाने, जिल्हा बँक, दूध संघ, बाजार समिती आदी अनेक सहकारी संस्थांचे कामकाज करीत असताना राजकारण न आणण्याची परंपरा आहे. कारण या संस्था शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये निवडणूक वगळता राजकारण न आणण्याची परंपरा सर्वांनी कायम ठेवावी, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी व निरा भीमा कारखान्यास विना परवाना गाळप केल्याबद्दल रु. 22 कोटी दंडाच्या बातम्या आल्या आहेत. या संदर्भातील दंडाच्या नोटिसा हा कामकाजाचा भाग असतो. अशा दंडाची वसुली होत नाही. यासंदर्भात दोन्ही कारखान्यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले आहे. मी सहकार मंत्री असताना प्रत्येक वर्षी असे कोट्यावधी रुपयांचे दंड रद्द केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. कारण साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या संस्था आहेत.
यावेळी निरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड.कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील उपस्थित होते. तर कर्मयोगी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, वसंत मोहोळकर, प्रदीप पाटील, पराग जाधव, राहुल जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, अंबादास शिंगाडे, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे उपस्थित होते. 
______________________________
.