स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि.
21/4/23 ) :

फोटो:-बावडा येथील जामा मस्जिद मध्ये आयोजित इफ्तार पार्टीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांशी संवाद साधला.
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
इंदापूर तालुक्यातील सर्वधर्मसमभाव हा राज्यामध्ये आदर्श असा आहे. बावडा येथे मुस्लिम समाजाच्या सार्वजनिक विकास कामांसाठी रु.50 लाखाचा निधी जिल्हा नियोजन विकास मंडळातून देण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे शुक्रवारी (दि.21) केली.
बावडा येथील जामा मस्जिद मध्ये आयोजित इफ्तार पार्टीमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी मुस्लिम बांधवांची संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, सदरच्या रु. 50 लाखाच्या निधी मधून मुस्लिम दफनभूमी व ईदगाह सुशिकरण- रु. 30 लाख, जामा मस्जिद सुशोभीकरण – रु. 10 लाख, खंडोबानगर येथील बाग सवार बाबा दर्गाह सुशोभीकरण – रु. 10 लाख याप्रमाणे विकासकामे केली जातील. ज्येष्ठ नेते कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे पासून गेली 70 वर्षांमध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व समाज एकमेकांशी बंधुत्वाच्या नात्याने गुण्यागोविंदाने राहत असून, तीच परंपरा आजही कायम असून, आगामी काळातही कायम राहील.
लुमेवाडी येथील फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबांचा दर्गाह राज्यासह परराज्यातही प्रसिद्ध झाला आहे. तेथील दर्गाहच्या विकासकामांबाबत आपण प्रारंभ पासून सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे. बावडा गावात पिढ्यान पिढ्या बंधूभावाने आपण एकत्र राहत आहोत. एकमेकांच्या सुखदुःखात कायम एकत्र असतो. हे नातं आगामी पिढ्यातही कायम राहणार आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना शीरखुर्मा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या इफ्तार पार्टीस अशोक घोगरे, राजवर्धन पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मनोज पाटील, विकास पाटील, सुभाष गायकवाड, उमेश सूर्यवंशी, हरिभाऊ बागल, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
____________________________