स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २१ / २ / २० २३) .

पतंजली योग समिती इंदापूर यांचे वतीने इंदापूरचे योग प्रमुख श्री दत्तात्रय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय योग शिबिर जि. प. प्राथमिक शाळा पडस्थळ येथे संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक रमेश जाधव, सहशिक्षक सुरेश घोळवे यांच्या सूचनेनुसार व सोसायटीचे चेअरमन भारत बोंगाणे, शाळा समिती अध्यक्ष सचिन मारकड, गणेश गव्हाणे, राजेंद बोंगाणे यांच्या सहकार्याने पतंजली योग समिती इंदापूर तर्फे घेण्यात आले.

या शिबिरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. अनपट यांनी योग शिबिरामध्ये प्राणायाम, आसन, सूर्यनमस्कार इत्यादि विषयी प्रत्यक्षात कृती करून मार्गदर्शन केले. प्रत्येकाच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी योग अभ्यासाचे महत्त्व सांगून त्यामध्ये सातत्य आवश्यक आहे याविषयी प्रबोधन केले.
केंद्रप्रमुख सुनिता कदम यांनी या आयोजन सोहळ्याचे कौतुक करून गुणवत्ता व शाळेची पटसंख्या वाढल्याबद्दल शिक्षकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली. यावेळी बोलताना चेअरमन भारत बोंगाणे म्हणाले की योगाभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यात फायदा होऊन त्याचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी होतो. शिक्षकांनीही गुणवत्ता वाढीबरोबरच मुलांच्या शारीरिक वाढीकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी अशा शिबिरांचे आयोजन खूप गरजेचे आहे. ग्रामस्थांनी देखील विद्यार्थी व शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना सहकार्य केले पाहिजे.

या कार्यक्रमास केंद्रप्रमुख सुनिता कदम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक रमेश जाधव यांनी केले तर आभार युवा नेते महेंद्र रेडके यांनी मानले.