स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे
​इंदापूर / ( दि. २३ /४ / २० २६):
वारकरी संप्रदायाची पंढरी मानल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेच्या शेजारी असलेल्या ‘भक्ती धाम’ (६५ एकर) परिसरात पुरुषोत्तम मासाच्या पवित्र पर्वावर एक भव्य दिव्य धार्मिक सोहळा संपन्न होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वे जन्मोत्सव वर्ष, श्री संत सावता महाराज ७७५ वे जन्मोत्सव वर्ष आणि श्री संत नामदेव महाराज व आदि १४ संतांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून ‘अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्री संत नामदेव गाथा पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
​हा सोहळा रविवार दि. १७ मे ते रविवार दि. २४ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार असून, यामध्ये इंदापूर तालुक्यातील भाविकांचा मोठा सहभाग असणार आहे.
​भव्य दिव्य मिरवणूक व क्षेत्र प्रदक्षिणा
​सप्ताहाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी दुपारी ३ ते ७ या वेळेत श्रीक्षेत्र पंढरपूर क्षेत्र प्रदक्षिणा व भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ३७५ धर्मध्वजधारी, ३७५ कलशधारी, ३७५ तुळशीधारी, ३७५ कीर्तनकार, ३७५ टाळकरी, ३७५ मृदंगसेवक, ३७५ ब्रह्मवीणाधारी, ३७५ चोपदार आणि ३७५ तुकाराम नावाच्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. तसेच ७५० ज्ञानेश्वर नावाचे भाविक आणि ६७५ जनाबाई नावाच्या महिला या मिरवणुकीची शोभा वाढवणार आहेत.
​दैनंदिन भरगच्च कार्यक्रम
​सप्ताहामध्ये दररोज सकाळी ६ ते ११ या वेळेत श्री संत नामदेव गाथा पारायण होईल. यामध्ये प्रतिदिन ११,००० गाथा वाचक, ९,००० टाळकरी आणि २५ मृदंगवादक आपली सेवा रुजू करतील. दुपारी ३ ते ५:३० या वेळेत श्री संत नामदेव महाराज जीवन चरित्र कथा ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली कदम यांच्या वाणीतून सादर होईल.
​प्रसिद्ध कीर्तनकारांची मांदियाळी
​सप्ताहामध्ये दररोज रात्री ८ ते १० या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत:
​१७ मे: ह.भ.प. श्रीगुरु राणा महाराज वासकर (प्रारंभ कीर्तन)
​१८ मे: ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे व ह.भ.प. श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर
​१९ मे: ह.भ.प. प्रभुराज महाराज वासकर व ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे
​२० मे: ह.भ.प. भागवत महाराज चिवटे व ह.भ.प. श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर
​२१ मे: ह.भ.प. श्रीराम महाराज झिंजुके व ह.भ.प. श्रीगुरु बंडातात्या कराडकर
​२२ मे: ह.भ.प. श्रीगुरु माधव महाराज नामदास
​२३ मे: ह.भ.प. रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे
​२४ मे: ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली कदम (काल्याचे कीर्तन – सकाळी ९ ते ११)
​इंदापूर तालुक्याचा ‘आमटी-भाकरी’ महाप्रसाद सेवायज्ञ
​या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे शनिवार दि. २३ मे २०२६ रोजी इंदापूर तालुक्यातील भाविकांकडून अर्पण करण्यात येणारा महाप्रसाद. तालुक्यातील हिंगणगाव, कांदलगाव, शहा, सरडेवाडी, पळसदेव, माळवाडी, ठाकूरवाडी, नरुटवाडी, पिंपरी खु., शिरसोडी, आजोती, चिंदादेवी, कालठण नं. १ व २, गलांडवाडी नं. १, वनगळी, राजवडी, गागरगाव, बनकरवाडी, करेवाडी, कळाशी, गंगावळण, वरकुटे बु., भावडी, चितळकरवाडी आणि शेटफळगढे या गावांतील प्रत्येक घरातून ११ भाकरी, आमटी, बुंदी आणि लापशीचा प्रसाद गोळा केला जाणार आहे. हा प्रसाद सायंकाळी ५ वाजेपर्यंत पंढरपूर येथील भक्ती धामात पोहोचवला जाईल.
​विशेष आकर्षण: हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
​या सोहळ्यासाठी येणाऱ्या दिंडी आणि भाविकांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, संपूर्ण पंढरी नगरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
​वृत्त संकलन:
स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे
मो. ९४२१०५६६७५