स्टार केबी न्यूज
- संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ३१ /१ / २० २६ ):

काँग्रेस पक्षाशी प्रदीर्घ काळ एकनिष्ठ राहिलेले आणि माढा तालुक्यात आपल्या कामाचा ठसा उमटवलेले सौदागरदादा जाधव (जाधववाडी) यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप
अकलूज येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सौदागरदादा जाधव यांना निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्रभाऊ पाटील, प्रदेश प्रवक्ते महादेव तळेकर सर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्षा विनंतीताई कुलकर्णी, जिल्हाध्यक्षा पल्लवीताई पाटील आणि भारत शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसमधील प्रदीर्घ प्रवास आणि मोहिते पाटलांशी जवळीक
सौदागरदादा जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. सुरुवातीला युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्यानंतर त्यांनी १० वर्षे माढा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्षपद, आणि जिल्हा सरचिटणीस व जिल्हा वरिष्ठउपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचे मोहिते पाटील घराण्याशी स्नेहाचे संबंध होते, त्यातूनच आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून ही नवी जबाबदारी स्वीकारली आहे.
पक्षवाढीला देणार प्राधान्य
या निवडीनंतर बोलताना सौदागरदादा जाधव म्हणाले की, “खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
नेत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
जाधव यांच्या निवडीबद्दल आमदार अभिजित आबा पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, नागेश फाटे, प्रा हरिदास रणदिवे सर,भारत आबा शिंदे, सागर गिड्डे, शिवाजी पाटील, रावसाहेब नाना देशमुख, नितीन गडकरे, बाबुराव सुर्वे, सुमित जामदार यांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
