स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर
( दि.24/3/23 ) :
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रयत्नातून इंदापूर शहरासाठी शिवसेना-भाजप युती सरकारने महाराष्ट्र नगरोत्थान अभियान योजनेतून नुकतेच रु.10 कोटी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रमांतर्गत रु. 3 कोटी असा एकूण रु. 13 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांकडून खोटे श्रेय घेणेसाठी भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रयत्न केल्याची फक्त पत्रे टाईप करून ती सोशल मीडियावर टाकून जनतेची दिशाभूल केली जात आहे. निधी मंजुरीशी संबंध नसताना राष्ट्रवादीचे आमदार व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी श्रेय घेण्यासाठी खोटारडेपणा करू नये, असा घाणाघात भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी शुक्रवारी(दि.24) इंदापूर येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी सर्व कागदपत्रे पत्रकारांसमोरून ठेऊन भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी निधी मंजूर केल्याचे पुरावे सादर केले.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शिवसेना भाजप युती सरकारकडून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे माध्यमातून इंदापूर शहरासाठी निधी मंजूर केल्याचे समजतात, सदरच्या मंजूर झालेल्या कामांची माहिती घेऊन नंतर पत्र तयार करायचे व ते दाखवून खोटे श्रेय घेण्याची राष्ट्रवादीचे आमदार व जिल्हाध्यक्षांची पद्धत असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष सय्यद यांनी सांगितले. त्यांनी दाखवलेल्या पत्रावर ती कुठे दिली, कोणी घेतली याची पोच,सही, शिक्का काही नाही. फक्त ते त्यांनी टाईप केलेली पत्रे दाखवत आहेत, असा हल्लाबोल सय्यद यांनी केला.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे नावे रु.10 कोटी व रु.3 कोटी निधीस शिवसेना-भाजप सरकारने मंजुरी दिल्याचे पत्र दिलेले आहे. तसे मंजुरीचे पत्र राष्ट्रवादीचे आमदार व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष यांच्याकडे नसताना ते भाजप-शिवसेना युती सरकारच्या कामांचे श्रेय घेण्याचा खोटारडेपणा करीत आहेत, असा आरोप भाजप शहराध्यक्षांनी केला आहे.
हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली सन 2007 पासून नगरपालिकेची सत्ता असल्याने इंदापूर शहराचा रचनात्मक असा विकास झाला आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार नसून शिवसेना भाजप युतीचे मजबूत सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे इंदापूर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे माध्यमातून सातत्याने विकास कामे मंजूर होत असल्याने, आता तरी राष्ट्रवादीचे आमदार व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी विकास कामांचे नाहक श्रेय घेण्याचा खोटारडेपणा करू नये, तुमचा खोटारडेपणा इंदापूर शहरवासीयांच्या लक्षात आला आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी नमूद केले. यावेळी इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, गोरख शिंदे, कैलास कदम, स्वप्निल सावंत हे भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
__________________________
