स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे
इंदापूर ( दि.६ /६ / २० २६ ):
“वृक्षारोपणाकडे जर आपण आता दुर्लक्ष केले, तर भविष्यात त्याचे अत्यंत गंभीर परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागतील. त्यामुळे केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती जगवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन वृक्ष संजीवनी परिवाराच्या अध्यक्षा सौ. सायराभाभी आत्तार यांनी केले.
५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून वृक्ष संजीवनी परिवार आणि इंदापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी स्थळ येथे विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेत चिंच, बकुळ, भेंडी, वड, पिंपळ, गुलमोहर आणि टर्मेलिया यांसारख्या पर्यावरणपूरक व सावली देणाऱ्या शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या पर्यावरणपूरक उपक्रमाला इंदापूर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून झाडे लावली. यामध्ये जय नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या सर्वेसर्वा सौ. लताताई नायकुडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरीताई लडकत, वृक्ष संजीवनी परिवारच्या अध्यक्षा सौ. सायराभाभी आत्तार, रश्मीताई निलाखे आणि स्वाती अधटराव प्रामुख्याने उपस्थित होत्या.
तसेच इंदापूर नगरपालिकेचे उद्यान प्रमुख अशोक चिंचकर, युवा क्रांती प्रतिष्ठानचे प्रशांतदादा सिताप, नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषदादा थोरात, ॲड. आनंद केकान, आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उत्सव समितीचे खुशाल महाराज कोकाटे यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.
३ वर्षांत हजारो वृक्षांची लागवड
गेल्या तीन वर्षांपासून ‘वृक्ष संजीवनी परिवार’ इंदापूर शहरात वृक्षारोपणाचा हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबवत आहे. आजपर्यंत या परिवाराने शहरातील विविध भागांत हजारो झाडे लावून ती यशस्वीपणे जगवली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाला पतंजली योग समितीचे देवराव मते, वृक्ष संजीवनी परिवाराचे चंद्रकांत देवकर (नाना), हमीदभाई आत्तार, श्रीनाथ सेवा संस्थेचे प्रमुख हनुमंत बोंगाणे, भारत बोराटे, गजानन पवार, सूरज गानबोटे यांच्यासह इंदापूर शहरातील नागरिक व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.