सदर घटनेतील मयतांच्या नातेवाईकांनी अडवल्या रुग्णवाहिका…
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीचा संरक्षण कठडा कोसळून मातीच्या ढिगाऱ्यखाली तब्बल १२० फूट खोल सापडलेल्या चारीही मजुरांचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासन व एनडीआरएफ पथकाला अखेर ७० तासानंतर यश आले आहे.
सदर घटनेमध्ये इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२वर्ष), जावेद अकबर मुलाणी (वय ३० वर्ष), परशुराम चव्हाण (वय ३० वर्ष) आणि मनोज मारुती सावंत (वय ४० वर्ष) हे मजूर मयत झाले आहेत.
विहिरीची रुंदी आणि खोली जास्त असल्यामुळे प्रशासनाला या चार मजुरांचा शोध घेण्याकरता मोठी कासकसर करावी लागली. यामध्ये अनेक मशिनरी, एनडीआरएफ च्या २० जवानांची तुकडी, इंदापूरचे तहसीलदार, स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन ७० तास तळ ठोकून उभा होती.
सदर मयताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका अडवल्या असून संबंधित कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
