स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (८ /२ / २० २६):
उजनी धरणग्रस्तांच्या संपादित जमिनी शासन आता ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’ (PPP) तत्त्वावर खासगी उद्योगपतींना देण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ येणार असून, या विरोधात ‘उजनी धरणग्रस्त बचाव समिती’ने आता एल्गार पुकारला आहे. या अन्यायी निर्णयाविरोधात रान उठवण्यासाठी बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता कांदलगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे पहिल्या भव्य जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नेमका प्रश्न काय?
शासनाने १७ जून २०१९ आणि ८ ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, उजनी धरणासाठी संपादित केलेली परंतु सध्या पाण्याखाली नसलेली (वहीवाटीतील) जमीन आता शेतकऱ्यांकडून काढून घेतली जाणार आहे. ही जमीन शेतकऱ्यांचे अतिक्रमण समजून, ती ‘पीपीपी’ मॉडेलनुसार खासगी उद्योगपतींना ४९ वर्षांच्या कराराने दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, ही जमीन गेली अनेक वर्षे धरणग्रस्त शेतकरी पूर्वपरंपरेने कसत आहेत.
शेतकऱ्यांवर संकटाची कुऱ्हाड
जर हा निर्णय अमलात आला, तर उजनी काठच्या जमिनीला शासनाकडून संरक्षण भिंत (Wall Compound) घातली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना खालील गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल:
- नदीकाठच्या जमिनींवर जाण्यास बंदी येईल.
- शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटारी, पाइपलाईन्स आणि ट्रान्सफॉर्मर काढले जातील.
- पाणी उपसा बंद झाल्याने बागायत शेती ओसाड पडेल.
- मच्छिमारांचा उदरनिर्वाह संपुष्टात येईल.
- पशुपालकांना जनावरे चारणे आणि पाणी पाजणे अशक्य होईल.
लढा अस्तित्वाचा!
या निर्णयामुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर शेतमजूर, मच्छिमार आणि पशुपालक यांचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होणार आहे. जगण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या या निर्णयाला वेळीच विरोध न केल्यास भविष्यात मोठे संकट उभे राहील, असा इशारा बचाव समितीने दिला आहे.
जाहीर आवाहन
आपल्या जमिनी आणि हक्क अबाधित राखण्यासाठी, तसेच शासनाच्या या निर्णयाविरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्यासाठी कांदलगाव येथील मारुती मंदिर चौकात होणाऱ्या या पहिल्या जनजागृती मेळाव्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘उजनी धरणग्रस्त बचाव समिती’च्या वतीने करण्यात आले आहे.
मेळाव्याचे ठिकाण: कांदलगाव, ता. इंदापूर, जि. पुणे.
वेळ: बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६, सायंकाळी ७ वाजता.
अधिक माहितीसाठी संपर्क:
९८२२०४८२७९, ९४२१७७६४८९