
स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १५ /४ / २ ० २६ ):
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे पार पडलेल्या ६९ व्या राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेच्या पूर्व प्रशिक्षण शिबिरातून महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. यामध्ये कालठणचा सुपूत्र दर्शन सावंत याची १४ वर्षांखालील मुलांच्या संघात निवड करण्यात आली असून, तो दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
सराव शिबिरात गाळला घाम
अकोला येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर ९ ते १४ एप्रिल दरम्यान या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दर्शन सावंत याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. सतीशचंद्र भट्ट यांनी खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक करताना म्हटले की, “प्रत्येक खेळाडूने एकजुटीने खेळून राज्यासाठी पदक जिंकून दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा उभारावा.”
स्पर्धेचे वेळापत्रक
दिल्ली येथे १५ ते २२ एप्रिल या कालावधीत ६९ वी राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ अकोल्याहून दिल्लीसाठी रवाना झाला आहे.
सहभागी संघ आणि मार्गदर्शक
दर्शन सावंत याच्यासोबत मुलांच्या संघात शिवम मोरे, रुद्र पाटील, जय कुंभार, समर्थ जाधव, सोहम गौरकर, अर्शन काझी, शौर्य कटारे, उत्कर्ष सोनुले, कुणाल उप्परवाडवे, शिवराज नांदे, कबीर गारले, आयुष बर्गे, पार्थ बत्तुले, हर्षवर्धन रोडे आणि समर्थ पाटील या खेळाडूंचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंना खालील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे:
- मुलांचे मार्गदर्शक: कल्पेश भागवत
- मुलींच्या मार्गदर्शिका: रेखा धंदर
- संघ व्यवस्थापक: श्रीमती मनीषा ठाकरे
- दर्शन सांवंत यास इंदापूर येथील डॉ . कदम गुरुकुल चे प्रशिक्षक श्री.सोमनाथ नलवडे सर
यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .
मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
दर्शन सावंत आणि संपूर्ण संघाला जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. सतीशचंद्र भट्ट, क्रीडा अधिकारी डॉ. अभिजित फिरके, जिल्हा संघटक राजेश गावंडे, आणि अकोला जिल्हा बेसबॉल संघटनेचे सचिव नारायण बत्तुले व रामेश्वर राठोड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दर्शन सावंत याच्या या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे कालठण गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या या खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे