स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (१३ /३ / २०२ ६) :
“योग ही केवळ शारीरिक प्रक्रिया नसून ती जीवन जगण्याची समृद्ध कला आहे. बदलती जीवनशैली आणि वाढत्या आजारांच्या काळात योग-प्राणायाम हाच खऱ्या आरोग्याचा राजमार्ग आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत संपूर्ण इंदापूर तालुका ‘योगमय’ करण्याचा संकल्प प्रत्येक नागरिकाने सिद्ध करावा,” असे प्रेरणादायी आवाहन पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थ देवजी यांनी केले.
इंदापूर येथील १०० फुटी रोडवरील नगरपालिका मैदानावर दि. १० ते १२ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय भव्य ‘इंटिग्रेटेड योग शिबिर’ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात संपन्न झाले. पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान आणि किसान सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिग्गजांच्या उपस्थितीत शुभारंभ

शिबिराचे उद्घाटन स्वामी परमार्थ देवजी, माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील, सोनाई समूहाचे दशरथदादा माने, नगराध्यक्ष भरतशेट शहा, चि. प्रितेश भरणे आणि समाजभूषण डॉ. लक्ष्मणराव आसबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा, डॉ. लहू कदम, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. सौ. कल्पना खाडे आणि विशालदादा बोंद्रे या मान्यवरांनी उपस्थित राहून साधकांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर , जितेंद्र माने व विलास गाढवे यांनी केले.
सांस्कृतिक सादरीकरणाने सोहळ्यात भरली रंगत
या शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे विविध संस्थांनी सादर केलेले कलाविष्कार:
- पै. मारुती मारकड कुस्ती केंद्र, इंदापूर आणि दादासाहेब पाटील विद्यालय, कांदलगाव च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘योग नृत्य’ पाहून उपस्थित थक्क झाले.
- जि. प. प्राथमिक शाळा (इरिगेशन), इंदापूर च्या विद्यार्थिनींनी लेझीमचा गजर करत मैदानावर चैतन्य निर्माण केले.
- महिला पतंजली योग समिती, इंदापूर च्या महिलांनी देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या योग नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्वामीजींचा आरोग्याचा ‘महामंत्र’
स्वामीजींनी आपल्या मार्गदर्शनात तरुणांमधील वाढते आजार, हार्ट अटॅक आणि किडनी विकारांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले:
१. व्याधीमुक्ती: नियमित योगाभ्यास आणि सात्विक आहार घेतल्यास कॅन्सरसारखे गंभीर आजारही रोखता येतात. जंक फूडचा त्याग करणे काळाची गरज आहे.
२. स्वदेशी आणि राष्ट्रनिर्माण: प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तूंचा वापर करून राष्ट्रनिर्माणात हातभार लावावा.
३. संस्कारांची जोपासना: आई-वडील, गुरूंचा सन्मान आणि गोमाता रक्षेचा संकल्प प्रत्येकाने करावा.
४. योगाची कर्मभूमी: इंदापूर तालुक्यातील १९ योग वर्गांचे कौतुक करत स्वामीजींनी या भूमीचा ‘योगाची कर्मभूमी’ म्हणून गौरव केला.
हजारो साधकांचा सहभाग
पहाटे ५ ते सकाळी ७:३० या वेळेत झालेल्या या शिबिरात शहर व परिसरातील सुमारे ३००० हून अधिक महिला व पुरुष साधकांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी सूर्या सोशल फाउंडेशन, एस.बी. पाटील कॉलेज (वनगळी), सोनाई परिवार, शहा परिवार, भरणे प्रतिष्ठान, जिजामाता हायस्कूल (सराटी), संजीवनी सोशल फाउंडेशन आणि रोटरी क्लब यांनी विशेष सहकार्य केले तसेच पार्किंग व्यवस्था संत निरंकारी सेवा मंडळाच्या वतीने अतिशय चोख करण्यात आली.
शिबिराचे प्रास्ताविक दत्तात्रय अनपट यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवनाथ चंदनशिवे यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी इंदापूर, कालठण, शिरसोडी आणि गलांडवाडी येथील योग कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.