अखेरच्या श्वासापर्यंत कर्मयोगी आणि सभासदांच्या हिताचा ध्यास :- हर्षवर्धन
काकासाहेब मांढरे इंदापूर . ( दि. १३ / ९ / २० २३) :इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी कर्मयोगी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व निरा-भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कर्मयोगी साखर कारखाना आणि सभासद यांच्या हिताचा निर्णय घेत कारखान्याची प्रगती केली जाईल.
या ३८ व्या सर्वसाधारण वार्षिक सभे वेळी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी केले व त्यास सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांच्या मंजुरीनंतर सभासदांनी कारखान्यासाठी काही विधायक सूचना केल्या. त्यानंतर, कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी गाळप हंगामाचा सविस्तर आढावा सादर केला.
कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचे विशेष अभिनंदन करून केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मयोगी कारखान्याला कोणतेही तारण न देता एनसीडीसी मार्फत १५० कोटी रुपये कर्ज दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
पुढे हर्षवर्धन पाटील म्हणाले की कर्मयोगी साखर कारखान्याच्या इतिहासात कारखान्याने कधीही सभासदाचा अथवा शेतकऱ्यांचा एक रुपयाही बुडवला नाही. काही लोकांकडून अनेक गैरसमज पसरवण्यात आले.मात्र त्या लोकांचे पुढे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. कर्मयोगी साखर कारखान्याच्या माध्यमातून येणाऱ्या हंगामात इतर साखर कारखान्याच्या बरोबरीने दर देण्याचा विचार सर्व संचालक मंडळाचा आहे. तसेच येणाऱ्या हंगामामध्ये कारखाना शेतकऱ्यांना काटा पेमेंट करणार आहे. त्यामुळे कर्मयोगी परिवारातील शेतकऱ्यांनी योग्य विचार करून सहकार टिकवण्यासाठी कर्मयोगी साखर कारखान्याला चांगले दिवस आणण्यासाठी आपला ऊस द्यावा अशी सर्व सभासदांना विनंती केली.
यावेळी निरा-भिमा साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम तसेच इंदापूर अर्बन बँकेचे संचालक स्वप्नील सावंत, अविनाश कोतमिरे,बबन शेटे- पाटील,दादा पिसे, युवा नेते सागर गानबोटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार कारखान्याचे संचालक राहुल जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी प्रयत्न केले.
